Breaking
संपादकीय

स्वर्गीय दादा कोंडके यांची डाऊन टू अर्थ दादागिरी!

दादा कोंडके.. आणि त्यांची डाउन टू अर्थ दादागिरी चाहत्यांकडून मिळणारे प्रचंड प्रेम आणि त्याच वेळेस तथाकथित संस्कृती रक्षकांकडून मिळणारी हेटाळणी हे दोन्ही पचवत मराठी सिनेसृष्टीत दादागिरी केलेलं व्यक्तिमत्त्व दादा कोंडके... ८/८ ला जन्मलेले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न. दादा कोंडके यांचे सामाजिक संदेश असलेले व्हिडिओ गेले काही दिवस मी माझ्या पोस्ट मध्ये वापरत होतो. त्यावेळी अनेक साथिंनी सांगितले की दादा कोंडके म्हणजे अश्लील एवढेच समीकरण डोक्यात रुजवले गेले.. त्यामुळे कधी पाहिलेच नाही त्यांचे चित्रपट. हा अनुभव माझा सुद्धा आहे.. लहानपणी दादा कोंडके यांचे चित्रपट आणि गाणी घाणेरडी असतात असे केवळ ऐकले होते. श्लील अश्लील हे शब्दही माहीत नव्हते त्या वयात.. ढगाला लागली कळ गाण्यावर नाचताना या गाण्यात काय घाणेरडे आहे हे कळत नव्हत.. अर्थात या लेखात त्यांनी केलेली द्विअर्थी गाणी किंवा चित्रपट हे द्वीअर्थी कसे नाहीत हे सांगन्याचा प्रयत्न नाही. यासाठीची त्यांची भूमिका दादांनीच वेळोवेळी स्पष्ट केली आहेच. तसेच दादा कोंडके यांनी चित्रपटातील काही प्रसंगात जाणून-बुजून सामाजिक प्रबोधनाचा विषय हाताळला आहे असे देखील माझे म्हणणे नाही. ते हे प्रसंग दाखवताना ते कचरले नाहीत.. बींदास भिडले हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. नायकाला शोभेल अशी ना बॉडी.. ना रूपडे.. तरी केवळ नावावर चित्रपट चालतात आणि प्रेक्षक पुन्हापुन्हा गर्दी करतात कारण त्यांचा प्रेक्षक वर्ग असलेल्या कष्टकरी जनतेसाठी करमणुकीचे महत्त्व, तिची रसिकता आणि दुखरी सुखरी नस दादांना कळली होती. चित्रपट बनवताना त्यांचा प्रेक्षक वर्ग ठाऊक होता तर भाषण करताना त्यांचा श्रोता वर्ग.. आणि सर्वात महत्त्वाची होती की ते ज्या मातीत जन्मले त्या मातीशी जुळलेली नाळ.... ८ ऑगस्ट १९३२ रोजी दहीहंडी च्या दिवशी नायगाव - मुंबईच्या एका गिरणी कामगाराच्या घरात दादांचा जन्म झाला. कृष्ण जन्मला म्हणून बाळाचे नाव कृष्णा.. जन्मल्यापासून एवढे किरटे अंग की आज मरतय का उद्या.. आईबापाला नुसता घोर.. इंगवली, भोर मधून पोटापाण्यासाठी मुंबईला आलेले त्यांचे कुटुंब. चार दिवसाच्या कृष्णाला पाहायला गावावरून मामा आला. वडील duty ला होते, त्यांना घरी यायचा सांगावा धाडला तर बापाला वाटले पोरग मेले. त्यांच्यासोबत मिलमधले शेदोनशे लोक घरी आल्यावर खुलासा झाला.. आणि हास्याचा स्फोट उडाला.. दादांनी घेतलेला पहिला मोठा हशा तो. ते बाळ जगलं..आईबापाला खूपच कौतुक.. लहान असून दादा झालं घरात. लाडाने येड झालेलं हे पोरग दहावी पर्यंत कसबस शिकल.. मात्र शाळेपेक्षा दुनियादारीच्या शिक्षणात त्यांना रस. नायगाव भागामध्ये दादागिरी सुरू झाली त्यांची.. वाद्य वाजवयाला लय आवडायची म्हणून टुकारगिरी करायला बॅंड पथकाच्या सोबत बसणे हा उद्योग. बालवयातच भरपूर भजने ऐकली असल्यामुळे ठेका रक्तामध्ये भिनला होताच.. दादांनी हळूहळू सर्वच वाद्ये शिकून घेतली.. आणि आता नायगाव परिसरात त्यांना "बॅंडवाले दादा" हे नाव मिळाले. मोठा भाऊ वारला आणि कौटुंबिक जबाबदारी पडली म्हणून दादा अपना बाजार मध्ये काम करायला लागले. दिवसा नोकरी.. रात्री बॅंड असे सुरू असताना आयुष्यात एक महत्त्वाचा बिंदू आला. अंगी असलेल्या कलागुणांमुळे त्यांना ‘राष्ट्र सेवा दला’च्या कलापथकात काम मिळाले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडे रचणे व गाणे आदी कामे करू लागले. ‘शाहीर’ हे बिरूद तिथेच लाभले. राम नगरकर, निळू फुले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते. नाटकात काम करायची दादांना प्रचंड हौस. मात्र डायलॉग बोलायची हिंमत नव्हती. मग पोस्टमन, पोलीस सारखे दुय्यम रोल करायचे.. ज्यात यांना संवाद नसेल. मात्र एक दिवस निळूभाऊंना प्रयोगाला उपस्थित राहता आले नाही आणि त्यांचा रोल दादांना करायला लागला. भीतभीतच प्रयोग केला...आणि भीतीचा राक्षस मेला.. अभिनेत्याचा जन्म झाला सांस्कृतिक कार्यक्रम व नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला, ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कलापथकही काढले. वसंत सबनिसांशी ते "खणखणपूरचा राजा" या नाटकामुळे जोडले गेले होतेच. दादांच्या आग्रहास्तव वसंत सबनिसांनी "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक लिहिले ज्या नाटकाने दादांना सुपरस्टार बनवले. राजा,नर्तकी व मूर्ख कोतवाल यांची गंमत दाखवत राजकीय अव्यवस्थेवर टीका करणारे हे नाटक म्हणजे अफलातून.. ज्याचे १५०० च्या वर प्रयोग झाले आहेत. बंदुकीच्या गोळी सारखे धाडधाड सुटणारे संवाद आणि नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर डोक्यावर घ्यायचे. ह्या नाटकामुळे दादांना चित्रपटाचे दार खुले झाले. भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली.(डौल मोराच्या मानाच रे आले का डोळ्यासमोर..माझ्या तर आले ब्वा) 'विच्छा" च्या प्रयोगात आलेल्या सन्माननीय पाहुण्याला नाटकातून कोपरखळी मारायला दादा प्रसिद्ध.. एवढे ... की कुणी मोठी व्यक्ती जाहीर रित्या येणार असेल तर त्या व्यक्तीचे समर्थक आधीच धमकी द्यायचे आमच्या साहेबांचे नाव घेऊ नको.. आणि विरोधी लोक पण धमकी द्यायचे आज त्याची वाट नाही लावली तर बघ. एकदा प्रयोग पाहण्यास आचार्य अत्रे आले होते. दादांनी सहकलाकाराला मोकार शिव्या द्यायला सांगितले.. आणि त्यावर दादांनी पंच हाणला, "अरे! आज सकाळपासून तू असा शिव्यांचा भडीमार करतोयस! काय आज सकाळी "दैनिक मराठा" वाचून आलास का?" बापरे... चार पाच लोक तरी हसताहसता मेली असतील. या विनोदावर आचार्य अत्रे किती मजली हसले असतील आपण कल्पना करू शकतो.. ‘तांबडी माती’ चित्रपट काही फार चालला नाही. मात्र भालजीबाबांकडे हा पठ्ठ्या तयार होत होता.. पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखालीच दादांनी ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. मात्र यश काही पायघड्या घालून दादांची वाट पाहत नव्हते. एक क्लायमॅक्स अजून बाकी होता. झाले असे की सोंगाड्या साठी बुक केलेले थिएटर ऐनवेळी मालक देवानंद साठी देऊ लागला. शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर "राडा" घातला! नाईलाज झाला आणि मालकाने बळेबळे सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे "सोंग" आणले..त्याला वाटले एका आठवड्यात पडेल चित्रपट.. तेवढे नुकसान सहन करू.... पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट .. देवानंद चा सिनेमा मात्र फ्लॉप... दादा स्टार झाले... पण ही तर फक्त सुरुवात होती १९७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हवा इतकी झाली होती, की राज कपूरने आपल्या पोराला लॉंच करणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली. 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. ऋषिच्या पोटात किती गोळा आला असेल विचार करा. पाच महिने झाले तरी एकटा जीव ची हवा कमी होईना. आणि ऋषीने पण किती दिवस पोटातला गोळा सांभाळायचा.. शेवटी राज कपूर सिनेमागृह मालकांना हाता पाया पडला.. 'एकटा जीव सदाशिव' उतरवला मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर हिंदी सिनेमाचे वेळापत्रक ...भारी वाटते खूप. तुम्हाला माहीत आहे पोलिसांना "पांडू" शब्द द्यायला दादाच कारणीभूत.... साधा सरळ नेक पोलीस... सोबत भन्नाट गाणी... पांडू हवालदार लोकांनी डोक्यावर घेतला. या पांडू हवालदारमुळे मुंबई मधे The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे भेटले नाही. पांडू हवालदार मुळे जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात झोपला.. लोकांना अमेरिकी बॉण्ड पेक्षा पांडू हवालदार जवळचा वाटणार ना. 'सोंगाड्या', ‘एकटा जीव सदाशिव’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘ह्योच नवरा पाहिजे’, ‘आली अंगावर’, ‘मुका घ्या मुका’, ‘मला घेऊन चला’, ‘पळवा पळवी’, ‘येऊ का घरात’, ‘सासरचं धोतर’, ‘वाजवू का?’ एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. दादांनी यासोबतच ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' दादांनी केले. ( असे म्हणतात बरं का.. काही लोक म्हणतात हे असले कसले रेकॉर्ड नसते.. दादांनी नेहमीप्रमाणे पसरवलेली अफवा आहे.) दादा अफवा, प्रशंसा आणि बदनामी यासर्वांचा कुशलतेने वापर करून घेत असत. सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत नकारात्मक प्रसिद्धी मिळत राहिली. दादांनी सेन्सॉर ची कशी जिरवली याचे किस्से पेरले जायचे. अर्थात दादांचा प्रेक्षक वर्ग यामुळे जास्त आतुर असायचा चित्रपट पाहायला.. श्लील अश्लील हे व्यक्ती सापेक्ष असते हेच खरे... दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत आलेल्या प्रेक्षकांना हसवणे हाच दादांसाठी खरा चित्रपटधर्म होता ... उगाच वैचारिक, कलात्मक किंवा वास्तव वादी चित्रपट बनवणे हे दादांच्या दृष्टीने अश्लील होते. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमते न घेता सेन्सॉरलाच प्रतिप्रश्न करून हैराण करायचे दादा. ते एका भाषणात म्हणाले होते की सत्तेवर आलो तर सेन्सॉर बोर्डातील सगळ्या म्हाताऱ्या काढून टाकीन आणि हमाल लोकांना नेमेल तिथे सोंगाड्या सुपर डूपर हिट झाला तेव्हापासून भोळा नायक ही मुख्य शैली दादांनी सुरु ठेवली. पुढे लक्ष्मीकांत बेर्डे आणि गोविंदा सुद्धा हीच शैली वापरत होता.‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा ट्रेडमार्क असणार... आणि ती आई पण अतिशय भक्कम व्यक्तिमत्त्व असणार हे ठरलेले... दादांच्या चित्रपटातील आई कधीच तुम्हाला रडकी, लेचीपेची दिसणार नाही.. गावाशी, समाजाशी भांडणारी, खमकी दिसणार. दादांनी जी चड्डीची फॅशन रुजवली.. ती भालजी पेंढारकर यांच्या थ्री फोर्थ वरून आलेली आहे. (भालजीबाबांवर स्वतंत्र आर्टिकल लिहायला पाहिजे) दादा आणि चड्डी हे समीकरण एवढे रूढ झाले आहे म्हणूनच पोस्ट सोबत मुद्दाम सुटा बुटातला फोटो टाकला आहे. आंधळा मारतो डोळा मध्ये डबल रोल करताना शहरी पॉलीश्ड माणूस भारी केला आहे दादांनी. जब्बार पटेल आणि दादा यांचे चित्रपट म्हणजे अगदी विरोधी टोके.. मात्र दादांनी त्यांना खूप मदत केली आहे.. घाशीराम मुळे जब्बार पटेल यांच्यावर प्रभावित होऊन त्यांनी मदतीचा हात पुढे केला. सिंहासन, उंबरठा हे चित्रपट दादांचा कॅमेरा भाड्याने घेऊन पूर्ण केले आहेत. दादांनी मुद्दाम कॅमेऱ्याच्या भाड्याचे निम्मेच पैसे घेतले होते. "दादांचे ‘बाई केळेवाली मी राया,’ हे गाणे पहिल्यांदा मीच ऐकले होते. तसेच ‘गगन सदन तेजोमय,’ हे गाणे त्यांनी डोळे मिटून ऐकले होते. हे गाणे हिट होईल, अशी दादही दादांनी दिली होती." अशी आठवण जब्बार पटेल सांगतात. यारोंका यार दादा.. उपकारकर्त्याची पण आजन्म जाणीव ठेवायचे मग ते बाळासाहेब ठाकरे असो किंवा भालजी पेंढारकर. स्टार असताना आणि स्वत चा सगळा सेट अप असताना पण दादांनी भालजीबाबांच्या "गनिमी कावा" या चित्रपटात काम केले. भालजी पेंढारकार ह्यांच्या मालकीचा जयप्रभा स्टुडियो होता तो त्यांनी काही कारणामुळे लता मंगेशकरांकडे गहाण ठेवला होता तेव्हा दादा कोंडकेंनी लताबाईंकडुन विकत घेउन भालजी पेंढारकारांना द्यायचा ठरविल होत. मात्र समोरून प्रतिसाद न मिळाल्याने प्रश्न निकाली निघाला नाही. शिवसेनेच्या प्रचारासाठी दादांनी केलेली मेहनत सगळ्यांना माहीत आहेच. १९९५ साली सत्ता आली तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मंत्रिपद देऊ केले होते. मात्र जेव्हा त्यांना समजले की बाळासाहेब स्वतः मंत्री पद घेणार नाही. "शिवसेनाप्रमुख" याच पदी राहणार.. तेव्हा दादांनी पण सांगितले ते आजन्म "शिवसैनिक" हेच पद भूषवतील. सच्चा शिवसैनिक... दादांनी जशी दोस्ती केली तशीच दुष्मनी पण अगदी दिलसे...व्ही शांताराम आणि दादा यांचे वॉर खूप गाजले. शांतारामांचा एवढा दबदबा होता की त्यांचा चित्रपट रीलिज होत असेल तर दुसरे निर्माते आपले चित्रपट पुढे ढकलत. पण हा नियम दादा कोंडकेनी मोडला म्हणून शांतारामांचा राग. मोठ्या लोकांचा मोठा ईगो... या दोघांच्या वादाचे खरे खोटे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र आधी चांगल्या बाबी घेऊ. व्ही शांताराम यांनी दादांना चॅलेंज दिले की पांचटपणा सोडुन एक तरी चांगले गीत वा भजन लिहुन दाखवा. त्यावर दादांनी "अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान" हे गाणे लिहीले जे प्रचंड गाजले. तेव्हा शांताराम बापू दादांना म्हणाले की "लय भारी मर्दा चंदनाच्या पाटावर या गाण्यासाठी देखील शांताराम यांनी दादांचे जाहीर कौतुक केलं होत म्हणतात. दादांशी पंगा घेणे ना सेन्सॉर बॉर्ड प्रमुख शांता शेळके यांना शक्य झाले.. ना व्ही शांताराम यांना.. कारण दादा म्हणजे एकदम रांगडा माणूस..दादांच्या पातळीवर येणे यांना शक्य नव्हते.. दादा तर बदनामी ला अजिबात न घाबरणारे... संध्या ला संध्या"काळी" म्हणायला त्यांना काय वाटतं नव्हते. आंधळा मारतोय डोळा हे टायटल शांताराम यांना उद्देशून होते. व्ही शांताराम यांनी दादा कोंडकेच्या सोंगाड्याची टर उडवायला पिंजरा मधील गाण्यात काही ओळी घातल्या. "दाजिबा गावात होईल शोभा आणि बत्ताशा कशाला पिळतोस मिशा" (दाजिबा आणि बत्ताशा ही सोंगाड्यातील दादा कोंडके आणि निळू फुले ह्यांची नावे). दादांनी पांडू हवालदारला गटारात पिंजरा सापडतो असा प्रसंग दाखवून बदला घेतला. शांतारामांनी "असला नवरा नको ग बाई" काढल्यावर दादांनी "ह्योच नवरा पाहिजे" काढला. 'सोंगाड्या' मध्ये निळू फुले तर 'पांडू हवालदार'मध्ये दादांनी अशोक सराफ यांच्यासोबत एकदाच काम केले म्हणून त्यांच्यावर आरोप केला जातो की सहकलाकार भाव खाऊन जाईल असे रोल दादा ठेवायाचे नाहीत. मात्र त्यांच्या टीम वर्क चे विशेष कौतुक..दादांचा चित्रपट म्हणाला की नायिका, गायिका, संगीतकार आणि बाकीचे सगळे सहायक फिक्स राहिले आहेत. पहिला चित्रपट ते शेवटचा.. title वर काम करायला नकोच. दादांचे चित्रपट आपण खऱ्या अर्थाने "सबकुच दादा" म्हणू शकू. कारण मुख्य भूमिका, कथा, पटकथा, संवाद, गीत, निर्माता, दिग्दर्शक आणि वितरक या सर्वच बाबी त्यांनी सांभाळल्या आहेत. वितरणप्रणाली यंत्रणा विकसित करण्यात दादांचे खासपण दिसून येते. ‘कामाक्षी’ ही चित्रपट-वितरण संस्था व सदिच्छा चित्र ही त्यांची चित्रपटनिर्मिती संस्था.. एका दृश्यात नगारा वाजवण्याचा आवाज हवा होता, आणि स्टुडिओमध्ये तर नगारा नव्हता. दादांनी स्वतःचा शर्ट वर करून स्वतःचे पोट माईकसमोर आणून असे वाजवले की नगार्‍याच्या आवाजच. चित्रपट पाहताना कुणीच ओळखले नाही. Really सबकुच दादा ना. "एकटा जीव सदाशिव" चित्रपट गाजवणारे दादा आयुष्यात प्रेमाच्या बाबत मात्र खरच "एकटा जीवच". लग्न केलं आणि लवकरच घटस्फोट देखील झाला. पत्नी नलिनी आणि तेजस्विनी नावाची कन्या वेगळी राहत होती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रेम प्रकरणे झाली. एकटा जीव सदाशिव या त्यांच्या आत्मचरित्र मध्ये अनेक त्याचे उल्लेख आहेत. ( मोठी नावे आहेत आणि तुमच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळी प्रतिमा आहे. तुम्ही स्वतः वाचा.. विश्वास ठेवायचा तर ठेवा.. नाण्याची ही केवळ एक बाजू असू शकते म्हणून नावे इथे मुद्दाम देत नाही) कारण काही का असेना.. दादा जनमानसांत नेहमी अविवाहित म्हणून वावरले. त्यांनी आपल्या चित्रपटातून भोंदूगिरीचा यथेच्छ समाचार घेतला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा दादांवर प्रभाव असावा. त्यातही दादांचा भविष्यावर लय राग.. लहानपणी एका जोतिषानी दादांना सांगितले होते "तू आयुष्यात कधीही प्रगती करणार नाही. तुझ काय खर नाही.." पण हा कामगार चाळीमध्ये जन्मलेला पोरगा दादरच्या शिवाजी पार्क मध्ये मोठ्या बंगल्या पर्यंत पोहचला. मार्च १४, १९९८ रोजी याच बंगल्यात त्यांना हृदयविकाराचा अटॅक आला..आणि मराठी भाषेचा गोडवा वाढवणारा आणि मराठी चित्रपटाची दहशत हिंदीवर गाजवणारा कलाकाराच्या आयुष्याचा सिनेमा समाप्त झाला.. दादांना माणसांचे व्यसन होते. दादांना भेटायला कुणी आले असेल तर त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो काढ, चित्रपटातील संवाद म्हणणे हे त्यांच्या आवडीचे.. बालपणाच्या सवंगड्यासोबत तर आजन्म दोस्ती निभावली. मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण असो वा दुकानाच्या उद्‌घाटनाचे दादा त्यांच्या आनंदात सहभागी होणारच. सुपरस्टार झाल्यावरही दादा आपल्या जुन्या चाळीकडे चक्कर मारत व जुन्या मित्र मंडळीत रमत. ज्या मातीतून उगवून सुपरस्टार झाले, दादांनी स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते.... व्दिअर्थी लेबल लागलेले दादा आयुष्यभर "डाउन टू अर्थ" शब्दाचा खरा "अर्थ" जगले.... दादा म्हणायचे की "लोकांना रडवणे खूप सोपे आहे, जन्माला येतानाच रडत येत असतो.. मात्र लोकांना हसवणे अवघड.." आयुष्यात केवळ लोकांना हसवायचा ध्यास घेतलेल्या दादांना आमच्या वृत्तवाहिनी कडून सलाम.. लव्ह यू दादा. मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 8 1 4

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे